महाविकास आघाडीचा जन आक्रोश मोर्चा
तालुक्यातील समस्या घेवून २७ ला धडकणार तहसीलवर
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : (बाभुळगाव/यवतमाळ):-
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने बाभुळगांव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान-मोठे व्यापारी, आदिवासी बांधव तसेच सुशिक्षीत बेरोजगारांचा तहसिल कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन शुक्रवार दि. २७ रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले आहे. खरेदी विक्री संघ येथुन मोर्चाला सुरुवात होणार असून बाभुळगांव तहसिल कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय देशमुख, प्रा. वसंतराव पुरके, सौ. संध्याताई सव्वालाखे, प्रफुल मानकर, अशोकराव घारफळकर, भिमसिंग बाबू सोळंकी, राजेंद्र गायकवाड, सौ.वर्षाताई निकम, किशोर इंगळे, अरविंद वाढोणकर, कृष्णाभाऊ कडू करणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती राजुभाऊ पांडे, श्रीकांत कापसे, श्याम जगताप, प्रविण खेवले, डॉ.रमेश महानूर, अॅड. सतिष ठाकरे यांची राहणार आहे.
बाभुळगांव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावा. शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर रू. ५०,०००/- मदत देण्यात यावी. बाभुळगांव तालुक्यातील मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. शेतकरी बांधवांना सरसकट पिक विमा देण्यात यावा. बेबळा प्रकल्प स्थानीक मच्छीमारी करिता राखीव ठेवण्यात यावा. बेबळा प्रकल्प ग्रस्तांना सरकारी नौकरी मिळावी अन्यथा रोजगारासाठी २५ लाख अनुदान देण्यात यावे. कोपरा – २, पहुर – २, कोल्ही या गावांना स्वतंत्र ग्राम पंचायतीचा दर्जा देण्यात यावा. बेबळा प्रकल्प ग्रस्तांचे न्यायालयीन निकाल लागून अजून पर्यंत निधी प्राप्त झाला नाही ते त्वरीत देण्यात यावा. बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध द्यावे अन्यता रोजगार भत्ता त्वरीत सुरु करण्यात यावा. सोयाबीनला सात हजार रुपये तसेच कापसाला दहा हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा. अतिक्रमीत घरकुल लाभार्थ्यांना शासनाने राहत्या जागेचा मालकी हक्क पट्टा देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा. ग्रामिण भागातील घरकुल लाभार्थ्यांना शहराप्रमाणे प्रती घरकुल रू. २,५०,०००/- येवढे अनुदान देण्यात यावे. ग्रामिण व शहरी असा भेदभाव करण्यात येऊ नये रखडलेले अनूदान त्वरीत देण्यात यावे. अल्पसंख्यांक घरकुल योजने अंतर्गत सर्व अल्पसंख्यांक समुदायाला घरकुल योजना त्वरीत मंजुर करण्यात यावी. बाभुळगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावारांचा अत्यंत त्रास होत आहे. उभ्या पिकाची नासाडी, पाळीव जनावारे मारणे, शेतकरी-शेतमजुर यांचेवर हल्ला करणे या सारखे प्रकार नेहमी घडत आहेत. तरी शासनाने यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. शेत – पांधन रस्ते त्वरीत सुरू करण्यात यावे, शहरासह तालुक्यामध्ये धडक सिंचन विहीर योजना त्वरीत सुरू करण्यात यावी. प्रलंबित कृषी पंपाची विज जोडणी त्वरीत सुरू करण्यात यावी. या प्रमुख मागण्या यावेळी शासनाकडे करण्यात येणार आहेत.
बाभुळगांव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान-मोठे व्यापारी, आदिवासी बांधव तसेच सुशिक्षीत बेरोजगारांनी शासनाला न्याय मागण्यासाठी मोठ्या संख्येने जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने मोहन बनकर तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रशांत वानखेडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गजानन पांडे तालुका प्रमुख शिवसेना (उ.बा.ठा.), मुकेश देशमुख, ता. कार्यकारी अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भरत बुराणे शहर अध्यक्ष भारतीय राष्ट्रिय काँग्रेस, शेख जाहिर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), सचिन माटोडे शहर प्रमुख शिवसेना (उ.बा.ठा.), कृष्णा ठाकरे तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस यांनी केले आहे.