*”राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्री भीमाशंकराकडे प्रार्थना*
पुणे दि. २ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे, शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे. सर्व विभागातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे,” अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
पुजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
भीमाशंकराचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातून येणाऱ्या भाविकांना येथे दर्शनाचे भाग्य लाभते. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. दर्शनानंतर अभिषेक झाल्यानंतर मनाला समाधान वाटते. ही वास्तू प्राचीन असून येथून सकारात्मक उर्जा मिळते. यावेळी देवाला साकडे घालताना राज्यातील संपूर्ण जनता भीमाशंकराच्या आशीर्वादाने सुखी, समृद्ध होऊ दे, आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, त्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ दे; सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे दिवस त्यांच्या कुटुंबात येऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे श्री. शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र प्रगत राज्य असून आपण राज्यात अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आदी कल्याणकारी योजना राबवत आहोत. एकीकडे कल्याणकारी योजना आणि एकीकडे विकास अशी सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. असेच काम चालू ठेवण्यासाठी ताकद, प्रेरणा आणि ऊर्जा द्यावी, अशी प्रार्थना केल्याचे श्री.शिंदे म्हणाले.