उच्चपातळी बंधाऱ्यामध्ये उडी घेत युवकाची आत्महत्या
परभणीतील ढालेगाव येथील घटना
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :(परभणी):-
पाथरी-माजलगाव सीमेवर असणाऱ्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या बॅक वॉटर मध्ये उडी घेत पाथरी तालुक्यातील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवार २२ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. घटनेनंतर सोमवारी दिवसभर गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून सुरू होता. प्रशांत माणिकराव गित्ते (वय २९ ) रा . ज्ञानेश्वरनगर, पाथरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत व त्याचे चुलते रविवार २२ सप्टेंबर रोजी रात्री माजलगाव हून चारचाकी गाडीने पाथरीकडे येत होते .राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील ढालेगाव पुलावर गाडी आल्यानंतर गाडीत बसलेल्या प्रशांत गित्ते याने गाडीच्या चाकाचा आवाज येत असल्याचे म्हणत गाडी पुलावर थांबवली. गाडीचा दरवाजा उघडून त्याने पुलाच्या कड्यावरून थेट गोदावरी नदीपात्रामध्ये उडी घेतली. ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यामुळे गोदावरी नदी पात्रात पाणी असल्याने सदरील युवक पाण्यामध्ये बुडाला. हा प्रकार पाहून सोबत असलेले चुलते घाबरून गेले. दरम्यान रात्रीच माजलगाव पोलीस ठाण्यात व पाथरी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली होती . सोमवारी सकाळी घटनास्थळी माजलगाव व पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. सोबतच पाथरी व मानवत अग्निशामक दलाचे कर्मचारी ही मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते . सोमवारी दिवसभर मृतदेहाचा शोध घेण्यात आला . दुपारी पाऊस आल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. ढालेगाव बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढल्याने बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडे असल्याने मृतदेह वाहून गोदावरी नदीत पात्रात गेला असल्याची शक्यता असल्याने गोदावरी किनारी भागातील पोलीस पाटील यांना घटने संदर्भात माहिती देण्यात आली आहे.